5) शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची

Originally published on March 29, 1992

Written by Dr Dileep Javadekar

आपले पैसे गुंतवताना त्या योजनेला लावायच्या काही कसोट्या आपण मागील लेखात पाहिल्या. परंतु या सर्व कसोट्यांवर उत्तमरीत्या उतरणारी गुंतवणूक योजना आपल्याला मिळेल का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

मुद्दलाची सुरक्षितता ही वाढत्या महागाईच्या धारेवर घासून तपासायला हवी, हे आपण मागील लेखात पहिलेच. मुद्दल नाहीसे होणार नाही, परंतु त्याची खरेदी करायची शक्ति त्या काळात कमी झाली तर तो एक प्रकारचा घाट्याचा व्यवहारच होईल. तेव्हा सुरक्षिततेचा विचार करताना महागाईच्या प्रमाणात पैशाची वाढ होणे हे किमानपक्षी आवश्यकच आहे. पगार घेणाऱ्या लोकांचे पगार महागाईच्या प्रमाणात महागाई भत्त्यामुळे वाढतात. व्यापारी लोक आपल्या पक्क्या मालाची किंमत कच्च्या मालात झालेल्या दरवाढीच्या प्रमाणात वाढवून नफा तेवढाच ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपली बचत, आपली गुंतवणूक ही महागाईच्या प्रमाणात वाढली तरच त्याचा उपयोग आहे. महागाईच्या प्रमाणात वाढते व्याज देणारी कोणतीही योजना आज तरी बँकांमध्ये नाही.

जरूरी भासल्यास पैसे परत मिळावे यासाठी आपण किती नुकसान करून घेतो तेही मोजायला हवे. शनिवारी सायंकाळी पैसे हवे असल्यास सोमवारी बँक उघडेपर्यंत थांबावे लागते. म्हणून घरातच बिनव्याजी हजारो रुपये ठेवणे शहाणपणाचे ठरेल काय? तसेच करंट किंवा सेव्हिंग खात्यावरचा चेक लगेच वटतो म्हणून सर्व बचत त्याच खात्यात ठेवून चालेल का? साधारणपणे अचानक आपल्याला किती पैशांची गरज लागू शकते याचा हिशेब प्रत्येक माणसाने व्यवसायाच्या स्वरूपावर, इतर मनोप्रवृत्तीवर ठरवावा. त्यापेक्षा जास्त रक्कम उभी करायला काही दिवस सवड मिळू शकेल. तेव्हा अशी जादाची रक्कम जास्तीत जास्त वाढीच्या योजनेतच ठेवणे शहाणपणाचे होईल. साधारणपणे आपल्या कुटुंबाच्या मासिक खर्चाच्या सहापट रक्कम (म्हणजे सहा महिन्यांचा सरासरी खर्च) हाताशी असला तरी पुरायला हरकत नाही. त्याहून जास्त काही अडचण आली तर पैसे उभे करायला सवडही मिळू शकते, असा विचार केल्यावर कुणालाही पटेल.

आपण केलेली बचत-गुंतवणूक महिन्या-महिन्याला वाढत जाईल. काही वर्षांनंतर हमखास अशी वेळ येईल, की या गुंतवणुकीतून होणाऱ्या नफ्यावर इन्कमटॅक्स भरावा लागेल. वर्षाला सोळा टक्के व्याज देणाऱ्या योजनेत आपली गुंतवणूक असेल आणि आपण पंचवीस टक्के कर भरू लागलो तर आपल्या हातात बारा टक्केच पडतील. अशा वेळी आपल्या हातात पडणारा ‘नेट’ दरच पाहावा लागेल.

वरील सर्व ‘आखुडशिंगी बहुदुधी’ अटींमध्ये बसवायचे असेल तर आपल्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त मूल्यवृद्धी (Capital Appreciation) मिळवणे एवढा मार्ग आहे. मूल्यवृद्धी ही साधारणपणे महागाई निर्देशांकाशी समतोल राखूनच होते. दीर्घ मुदतीच्या मूल्यवृद्धीला आयकरातूनही बरीच सूट असते. तेव्हा आपली गुंतवणूक जर अशा मालमत्तेमध्ये (सोने, स्थावर किंवा शेअर) असेल तरच वाढत्या महागाईला आपण तोंड देऊ शकू.

एक वर्षापूर्वी निरनिराळ्या ठिकाणी गुंतवलेले एक हजार रुपये आज किती वाढले याचा विचार मोठा मनोरंजक आहे : शेअर – २६०० रुपये, सोने – ११०० रुपये, बँक (सेव्हिंग) – १०६० आणि बँक डिपॉझिट – ११२० रुपये.

वरील आकडेवारी वाचून जरी मूल्यवृद्धीची कल्पना लक्षात आली, तरी पहिल्या दोन गुंतवणुकी या जोखमीच्या गुंतवणुकी समजल्या जातात. परंतु तसे पाहिलं तर आज आयुष्यात आपण अजिबात जोखीम घेत नाही का? आपल्या कळत नकळत आपण रोजच्या रोज अनेक प्रकारची जोखमीची कामे करत असतो. तसे पाहीले तर आजकाल रस्त्यावरून चालणे, वाहन चालविणे हीसुद्धा एक मोठी जोखीमच आहे. बसने, विमानाने प्रवास करणे, व्यवसाय-उद्योग करणे, मुलांना वाढवणे, संसार चालवणे यात रोजच्या रोज आपण किती जोखीम घेत असतो याचा आपण विचारसुद्धा करत नाही. तसेच गुंतवणुकीच्या जोखमीचे जोखडही सवयीने हलके वाटू लागते. थोडी जोखीम घेतल्याशिवाय त्याचे बक्षीसही मिळणार नाही. फक्त त्या जोखमीचा हिशेब आपल्या मनाशी पक्का हवा.

आज गुंतवणूक म्हणून माहिती नसलेल्या क्षेत्रात हजारो रुपये गुंतवून नंतर काहीच हातात नसल्यामुळे ‘हरी हरी’ करणारी अनेक उदाहरणे आपल्याभोवती असतात. कुणीतरी सांगितलं म्हणून कुठंतरी गावाबाहेर शेतीतला प्लॉट घेऊन ठेवला, आता कित्येक वर्षे तो बिगरशेतीही होत नाही आणि विकलाही जात नाही. बर याबाबतीत वैयक्तिकरीत्या आपल्याला काही करताही येत नाही. पूर्वी गुंतवणूक म्हणून घेतलेल्या फ्लॅटमध्ये कर्ज होते म्हणून भाडेकरी ठेवला, तो आता जागाही मोकळी करत नाही आणि कोर्टात निकालही लागत नाही, अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. तेव्हा पुढेमागे कायम आपल्या हातात ज्याचे व्यवस्थापन राहील अशीच गुंतवणूक करायला हवी. कारण शेवटी आपल्या बचतीलाही मर्यादा आहे. आपल्या घामाचा पैसा वर्षानुवर्षे अडकून पडलेला कुणालाही आवडणार नाही.

यादृष्टीने शेअरमधील गुंतवणूक ही आदर्श गुंवणुकीच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचणारी ठरते. फक्त याबाबतीत आपण बरेच लोक अनभिज्ञ असतो आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही इतकेच!

Ashay Javadekar

Previous
Previous

4) व्याजाइतकीच सुरक्षितता महत्त्वाची

Next
Next

6) शेअरना पर्याय नाही