28) ‘ऑड लॉट’चा गुंता

Originally published on September 6, 1992

Written by Dr Dileep Javadekar

बोनस आणि राईट इश्यू यामुळे, आपल्याकडचे शेअर्स कसे वाढतात हे आपण पाहिले. नवे बोनस अगर राईट शेअर्स आले की पहिले आपल्याकडे असलेले त्याच कंपनीचे शेअर्स विकून फायदा मिळवणे हा शेअर बाजारातील फायदा मिळवण्याचा सोपा व्यवहार आहे. हा कुणालाही जमतो. यामुळे आपले पहिले अडकलेले भांडवलही मोकळे होते. तसेच त्या कंपनीचे नवे शेअर्स हातात आल्यामुळे कंपनीत होल्डिंगही राहते.

परंतु असे हे राईट किंवा बोनस जरी आपल्यासमोर छान नजराणा घेऊन येत असले तरी त्यामुळे बाजारात (आणि आपल्याकडे सुद्धां) एक मोठा गुंता निर्माण होतो. या गुंत्याचं नाव आहे ‘ऑड लॉट’! मागील लेखात याचा पुसटसा उल्लेख आपण पाहिला आहे. बाजारात व्यवहार सोपे जावे म्हणून प्रत्येक कंपनीचे ‘मार्केट लॉटस्’ ठरवून दिले आहेत. यालाच ‘मार्केट लॉट’, ‘मार्केटबल लॉट’, ट्रेडेबल लॉट’ किंवा ‘इव्हन लॉट’ असे म्हणतात. शेअरबाजाराच्या रिंगमध्ये फक्त या ‘मार्केट लॉटस्’ मध्येच त्या-त्या शेअर्सची विक्री किंवा खरेदी होते. म्हणजे एखाद्या कंपनीचा १०० चा मार्केट लॉट असेल तर आपण १००, २००, ३०० असेच शेअर्स बाजारातून खरेदी करू शकतो. मला साठच शेअर्स परवडतात म्हटले तर बाजारात मिळणार नाहीत. यामुळे व्यवहार सोपे होतात.

काही शेअर्सचे ‘मार्केट लॉटस्’ ५० चे तर काहीचे १०० चे, काहीचे ५ चे किंवा १० चे असेही आहेत. आता ही भिन्नता का? तर पूर्वी काही शेअर्स १०० रु. फेस व्हॅल्यूचे तर काही काही १० रुपये फेस व्हॅल्यूचे होते. त्याप्रमाणे मार्केट लॉट ५ किंवा ५० चे ठरवले गेले. नंतर १० रुपये फेसव्हॅल्यूचे शेअर्स काढावेत असा फतवा निघाला. जुने १०० फेसव्हॅल्यूचे शेअर्स १० रुपयेवाल्या शेअर्समध्ये रुपांतरितही केले. (उदा. टाटा स्टील, टेल्को, साऊथ इंडिया, व्हिस्कोज आदी) तरीही अजून काही १०० रुपये फेस व्हॅल्यूचे आहेतच. (ए.सी.सी., टाटा पॉवर आदी) तसेच एकंदर शेअर बाजारातील उलाढाल पाहून नवीन कंपन्यांना कमीत कमी मार्केट लॉट १०० शेअर्सचाच ठेवण्याचे आदेश आले. त्यामुळे आता नव्या सर्व कंपन्यांचे शेअर्स १० रुपये फेस व्हॅल्यू आणि १०० चा मार्केट लॉट असेच आहेत. हळूहळू सर्व जुन्या कंपन्यांनीही या चौकटीत यावे अशी अपेक्षा आहे.

आता या कंपन्या जेव्हा बोनस किंवा राईट देतात तेव्हा तो नेहमी एकास एक (किंवा शंभरास शंभर) असाच असतो, असे नाही. तो कधी कधी पाचास एक, तीनास दोन असंही असतो. शिवाय आपण जास्तीचे राईटस् मागतो तेही कमी अधिक मिळतात. त्यामुळे पहिले आपल्याकडे शंभर शेअर्स असले तरी नंतर त्याच कंपनीचे २०, ६०, ६७ असे मिळून जातात. पहिले शंभर मार्केट लॉटमध्ये असल्याने विकले जातात. नंतरचा बाजारात विकत न येण्याजोगा भाग असतो. त्याला ‘ऑड लॉट’ म्हणतात.

एखाद्या व्यक्तीकडे ज्या ज्या कंपन्यांचे शेअर्स असतात त्याची एकत्रित यादी केली की त्या यादीला त्या व्यक्तीचा ‘शेअर पोर्ट फोलिओ’ म्हणतात. काही दिवस जो शेअर मार्केट मध्ये आहे. अशा प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये अशा ‘ऑड लॉटस्’चा कमी अधिक भरणा असतो.

फक्त मार्केट लॉट पेक्षा कमी शेअर्सनाच ऑड लॉट म्हणतात का? एखाद्याकडे दोनशे किंवा पाचशे शेअर्सचे एकच प्रमाणपत्र आहे, तर तो मार्केट लॉट धरायचा का? याचे उत्तर नाही असे आहे. मार्केटमध्ये फक्त शंभर शंभरची सुटी प्रमाणपत्रे दिली किंवा घेतली जातात. त्यामुळे दोनशे किंवा पाचशेच एक प्रमाणपत्र हे सुद्धा ऑड लॉटस् धरल जाते. नुकतेच यूनिट ट्रस्टने UGS - २००० आणि UGS - ५००० हे त्यांच्या म्युच्युअल फंडाचे शेअर्स बाजारात खरेदी विक्रीसाठी लिस्ट केले जातात. मात्र त्याच गुंतवणूकदाराकडे अशीच २००, ३०० आदीची एकेरी प्रमाणपत्रे असल्यामुळे बाजारात त्यांची विक्री करता येत नाही.

आता हा असा ऑड लॉटचा गुंता सोडवायचा कसा? आपल्याकडे १०० पेक्षा जास्त शेअर्स, परंतु ऑड लॉट मध्ये (६५ एक सर्टिफिकेट आणि ५५ चे दुसरे) असतील तर ते कंपनीकडे मार्केट लॉट करण्यासाठी सोबत पत्र जोडून पाठवून द्यावे. याला Consolidation आणि Splitting म्हणतात. कंपनी ते १०० चे एक आणि २० चे एक अशा दोन सर्टिफिकेटस् मध्ये रूपांतरित करून देईल. हे काम कंपन्या विनामूल्य करतात.

फक्त ऑड लॉट देणारे व घेणारे काही ब्रोकर्स, सब ब्रोकर्स असतात. त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये येतात. अशा ठिकाणी जाऊन आपल्याला आपले ऑड लॉट विकता येतील किंवा तिथून काही खरेदी करून आपला ‘मार्केट लॉट’ करता येईल. विकताना ब्रोकर बाजारभावापेक्षा १०-१५ टक्के पैसे देईल. आणि आपण मागणी केली तर जास्त भावाने देईल. आपला आपण हिशेब करून सोयीचा सौदा करावा.

युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, जी.आय.सी., एल.आय.सी. आदी अर्थसंस्था मुंबईत ऑड लॉट खरेदी करतात. परंतु तिथेही भावाबाबत अशीच तडजोड करावी लागते.

आपल्या शहरातील इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या सभेत आपल्यासारखे कुणाकडे ऑड लॉट असल्यास दोघांनी एकत्र येऊन मार्केट लॉट करून विकावा.

मद्रास स्टॉक एक्सचेंजसारख्या काही ठिकाणी आठवड्यातून मुद्दाम ऑड लॉट सेशन्स भरवली जातात. तिथेही ब्रोकरच्या हस्ते हे विकता येतील. पण दलाली वजा जाता हातात १०-१५ टक्के कमी भावच बहुधा पडेल.

सोपा मार्ग म्हणजे ऑड लॉट ठेवून द्यावेत. पुन्हा कधी राईट बोनस येईल, तेव्हा मार्केट लॉट होईल अशी आशा धरावी.

Ashay Javadekar

Previous
Previous

27) राईट इश्यू

Next
Next

29) ऑडलॉट शेअरसाठीचा सल्ला