29) ऑडलॉट शेअरसाठीचा सल्ला

Originally published on September 13, 1992

Written by Dr Dileep Javadekar

ऑडलॉट शेअरसाठी काय काय करता येईल याचा मागोवा आपण थोडक्यात घ्यायचा प्रयत्न केला. परंतु शेअर बाजार किंवा सरकारने यासंबंधी काही नियम किंवा मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत की नाहीत?

१४ एप्रिल १९८६ च्या भारत सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे देशातल्या सर्व शेअर बाजारांना त्यांचा रिंगमध्ये सौदे होऊ शकतात अशा सर्व कंपन्यांकडून खालील गोष्टी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

१) जेव्हा जेव्हा कंपन्यांकडे ट्रान्स्फरसाठी ऑडलॉट शेअर्स येतील आणि त्यांच्या संख्येमुळे एखादा मार्केट लॉट त्यात होऊ शकत असेल तेव्हा तेव्हा गुंतवणूकदारांची तशी विनंती नसेल तरीही एक मार्केट लॉटचे आणि दुसरे ऑडलॉटचे अशी नवी सर्टिफिकेटस् नव्या नावावर पाठवावीत. उदाहरणार्थ मी एक ५५ शेअर्स आणि दुसरे ६५ शेअर्सचे सर्टिफिकेट एखाद्या कंपनीकडे ट्रान्स्फरसाठी पाठवले तरी मी तशी सूचना दिली नसली तरीही कंपनीने १०० (मार्केट लॉट) आणि २० (ऑडलॉट) अशी नवी सर्टिफिकेटस् माझ्या नावावर पाठवावीत आणि जुनी सर्टिफिकेटस् रद्द करावीत.

२) जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा कंपन्यांनी स्वत: आपणहून पुढाकार घेऊन शेअर होल्डर्सना त्यांच्याजवळील ऑडलॉट कंपनीकडे पाठवायला सांगावेत. असे सर्व शेअर्स स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांनी नेमलेल्या ‘नॉमिनी’ कडे सूपूर्द करावेत. त्या ‘नॉमिनी’नी त्यांचे मार्केट लॉट करून ते बाजारात विकावेत आणि जमा झालेली रक्कम शेअर होल्डर्सना त्या त्या प्रमाणात वाटावी. वरील दोन्ही गोष्टी सरकारतर्फे सांगितल्या गेल्या असल्या तरी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ते काही कंपन्यांवर बंधनकारक असे कायदे किंवा नियम नाहीत. त्यामुळे बहुतेक कंपन्या वरीलपैकी कोणतीही गोष्ट करण्यात उत्सुकता दाखवत नाहीत.

काही अर्थसंस्थांनी ऑडलॉट खरेदी करण्यासाठी काही योजना काढल्या आहेत.

जी. आय. सी. जनरल इन्शुरन्स कार्पोरेशनने काही निवडक कंपन्यांचे ऑडलॉट खरेदी करण्याची योजना ५ फेब्रुवारी १९८८ पासून सुरू केली आहे. या कंपन्यांची यादी त्यांच्या कार्यालयात पाहायला मिळते. दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी २.३० ते ४ वाजेपर्यंत हे व्यवहार मुंबईतल्या ऑफिसमध्ये होतात. आदल्या दिवशीच्या बंद भावाचा आधार घेऊन त्यातून ३ टक्के सर्व्हिस चार्ज कापून घेतला जातो. कंपनीकडून ट्रान्स्फर फॉर्मवरील सहीच्या सत्यते-बद्दल खात्री पटल्यानंतरच गुंतवणूकदाराला पैसे दिले जातात. कॅनफिना - कॅनबँक फायनान्शियल सर्व्हिससने मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगलोरला ही सेवा देऊ केली आहे. मुंबई शेअर बाजार चालू असेल त्या सर्व दिवशी दुपारी ११ ते १२.३० पर्यंत ऑडलॉट शेअर्स स्वीकारले जातात. एका गुंतवणूकदाराकडून जास्तीत जास्त २०० शेअर्सच घेतले जातात. कोणत्या कंपन्यांचे शेअर्स काय दराने घेतले जातील याची यादी तिथेच पाहायला मिळते. सहीची खात्री होऊन पैसे मिळायला महिन्यापेक्षा जास्त काळ लागतो. पाच टक्के सर्व्हिस चार्ज आकारला जातो.

कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाने जर आपली सही बरोबर असल्याबद्दल निर्वाळा दिला असेल तर दुसऱ्या दिवशीही पैसे मिळू शकतात. मात्र यासाठी आणखी दोन टक्के कमिशन आकारले जाते.

युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया- युनिट ट्रस्टने १९९० मध्ये ऑडलॉट खरेदी योजना सुरू केली आहे. ती मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद आणि मद्रासला कार्यान्वित आहे. मात्र या ठिकाणी शेअर्ससाठी प्रत्यक्ष पैसे दिले न जाता युनिट ट्रस्टच्या योजनांपैकी तेवढ्या रकमेची काही खरेदी करावी लागते. जर आपण विकलेल्या ऑडलॉटची किंमत एखाद्या युनिट योजनेच्या कमीत कमी युनिट खरेदीपेक्षाही कमी भरत असेल तर बाकी रक्कम आपल्याला ताबडतोब भरावी लागते. युनिट सर्टिफिकेटस् अर्थातच सहीची खात्री झाल्यावर म्हणजे महिन्या दोन महिन्यांनी येतात.

वरील योजना जरी आकर्षक वाटत असल्या तरी प्रत्यक्ष तिथे आपण ऑडलॉट घेऊन गेल्यावर वेगळाच अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदल्या दिवशीचा बंद भाव हा आधारभूत धरला पाहिजे, असे या अर्थसंस्थांवर बंधन नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांनी दिलेली ऑफर बाजारभावापेक्षा पुष्कळच कमी असते आणि मग केवळ सोय होते या नावाखाली अशा कमी भावात आपल्याला सौदा करावा लागतो.

ऑडलॉटचे सौदे ठराविक वेळेला प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये नियमितपणे जोपर्यंत सुरू होत नाहीत तोपर्यंत हा ऑडलॉटचा गुंता असाच राहणार. प्रत्येकाच्या पोर्ट फोलिओमध्ये काही टक्केवारी ऑडलॉटची असतेच हे लक्षात घेऊन आपल्याकडच्या ऑडलॉट शेअर्सबद्दल फार उदासीन न होणे केव्हाही चांगले. शेवटी आपल्याकडची सर्व मालमत्ता इच्छा होईल त्या दिवशी विकता येत नाहीच. घरा-घरातील फर्निचर, इतर वस्तु याबद्दल तर हा विचारही आपण करत नाही. मग चांगल्या कंपन्यांच्या ऑडलॉटस् बद्दलही अशीच प्रेमाची आपुलकीची भावना जोपासायला काय हरकत आहे?

Ashay Javadekar

Previous
Previous

28) ‘ऑड लॉट’चा गुंता

Next
Next

30) वायदेबाजार म्हणजे काय?